Jump to content

User:Santosh pralhad dalal

From Wikipedia, the free encyclopedia

आयुष्य म्हणजे जगण्याची लढाई, अशी आयुष्याची व्याख्या कुणीतरी केली आहे. मात्र, ही केवळ जगण्याची लढाई नसते, तर यामध्ये एक सुसंगत अशी सुखांची मालिकाही असते. काही जणांना ही सुखे गवसतात, तर काही जणांना ती शोधावी लागतात. काही जण तर आपण जन्मालाच कशाला आलो, अशा टोकाच्या भावना व्यक्त करताना दिसतात. अशांसाठी ही तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली… लाईफ स्टाईल – यामधून उपस्थित असणाऱ्या वयोगटानुसार व कामानुसार त्यांनी दिवसभर आनंदी कसे रहावे, ताणतणाव- मुक्‍त कसे रहावे याबाबत माहिती दिली जाते. यात कथा, कविता, काही किस्से तसेच अनुभव यांचा समावेश केला जातो. तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा – नवीन अभ्यासक्रम – याबाबत शाळांमधील विद्यार्थी, पालक व शिक्षक, मुख्याध्यापक यांना माहिती दिली जाते. नवीन अभ्याक्रमांची उद्दिष्टे, नवीन संकल्पना, आशय याबाबत माहिती होणे आवश्‍यक आहे. शालेय स्तर – मूल्यमापन योजना – नवीन शैक्षणिक धोरण, मोफत व सक्‍तीचे प्राथमिक शिक्षण अधिनियम यानुसार परीक्षा पध्दती, मूल्यमापन योजना याबाबत माहिती घेणे आवश्‍यक ठरते. विद्यार्थी शैक्षणिक व व्यावसायिक प्रगती यात पालक व शिक्षकांची भूमिका महत्वाची असते. यामध्ये विद्यार्थी, इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत त्याचे निरीक्षण, त्याची कुवत, विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखून त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे ठरते. याशिवाय विविध सामाजिक प्रश्‍न व काही विषयावरील माहिती देणेही क्रमप्राप्त ठरते.

ताणतणावमुक्‍त जीवन काय लागतं जगायला? कवी दत्ता हलसगीकर म्हणतात, आपण कोणाला तरी आवडतो हे फार असतं जगायला अन्‌ आपली कुणीतरी वाट पाहतंय हे फार असतं चालायला… एवढंच लागतं, मग कशाला हवाय ताण आणि तणाव, तणावमुक्‍त जीवन जगणं म्हणजेच दररोजच जगणं होय, तसेच दररोजचं जगणं म्हणजे आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगणं होय, मनाने जगणे म्हणजे मनाप्रमाणे, मनाजोगतं, मनस्वी आणि मनसोक्‍त जगणं, भरभरून जगणं, स्वतःचा पिंड ओळखून, सहज स्वाभाविकपणे जगणं, आपली पट्‌टी ओळखून तिच्यातच सुरेल गाणं.

यासाठी काय लागतं तर

उत्तम मानसिक आरोग्य –

ताणतणावमुक्‍त

शारीरिक आरोग्य – उत्तम आहार आणि व्यायाम
सामाजिक आरोग्य – सकारात्मक नातेसंबंध
आध्यात्मिक आरोग्य – ध्यानधारणा, श्रद्धा आणि विश्रांती

या सर्व गोष्टींचे उत्तम संतुलन म्हणजेच उत्तम आरोग्य आणि हे जर असेल तर ताणही येत नाही आणि तणावही येत नाही. ताण येतो म्हणजे मनाची अशी अवस्था निर्माण होते की माणसाला परिस्थितीशी जूळवून घेता येत नाही. अशा अनेक घटना आहेत की ज्यामुळे ताण निर्माण होतो. यामध्ये 1. आकस्मिक घटना 2. काही वैयक्‍तिक घटना 3. काही नित्य घटना इ. आपण जर मनाशी ठरवलं की हे असे घडणारचं आहे तर मग आपलं मन अगोदरच तयार होतं आणि आपल्याला या घटनांचा ताण येत नाही. यासाठी मनाची सहन करण्याची क्षमता वाढवली पाहिजे.निराशावादी, भित्र्या, अविवेकी व्यक्‍तींची ताण सहन करण्याची क्षमता कमी असते. स्त्रियांची सहन करण्याची क्षमता पुरुषांच्या मानाने अधिक असते त्यामुळे त्यांना ताण कमी येतो. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणारचं नाहीत असं मनाशी पक्‍कं केलं पाहिजे. काही घटना अशा घडल्या तर त्यावर आपण काही उपायही काढले पाहिजेत उदा. योग्य त्या प्रसंगी काही वेळा नाही म्हणायला शिकलं पाहिजे, प्रतिकूल परिस्थिती मान्य केली पाहिजे. काही वेळा माघारसुध्दा घेतली पाहिजे, एखादी गोष्ट जमत नसेल तर नवीन मार्ग शोधला पाहिजे. एकूणच काय तर प्रत्येक क्षणाला आनंदी राहता आलं पाहिजे, किती सोपं आहे नाही आनंदी जगणं, पण हे न करता आपण नको त्या गोष्टींची, ज्या शक्‍य नाहीत त्या बाबींची चिंता करतो. चिंतन करणे चिंता करण्यापेक्षा नक्‍कीच चांगले असते. त्यामुळे निदान मार्ग तरी मिळतो आणि ताण कमी व्हायला मदत मिळते. काळजी जरूर असावी, चिंता असू नये माणसाला नेहमी भविष्याची चिंता असते. करिअरची चिंता असते, स्वतःच्या मुलांच्या करिअरची काळजी असते. खरचं करिअर म्हणजे तरी काय? मग हेच जर का आपण आवडीचं निवडलं ज्यात गती आहे, ज्यामधे आनंद मिळतो, तर मग जीवन सुंदर होऊन जातं. तसेच जगायला किती लागते याचाही आपण विचार करायला पाहिजे. आपण रोजच्या जीवनाचा विचार केला तर शारीरिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण व्यायाम करतो का ? कमीतकमी दररोज एक तास तरी व्यायाम केलाच पाहिजे. आपले शरीर निरोगी, वजन उंचीप्रमाणे पाहिजे याची आपण काळजी घेत नाही. बॉडी मास इंडेक्‍स म्हणजे ज्याच्या पोटाचा घेर छातीपेक्षा कमी म्हणजे ती व्यक्‍ती तंदुरुस्त म्हणायला हरकत नाही. व्यायामाची मजा घराबाहेर पडल्याशिवाय घेता येत नाही, नाही तर आपण प्रथम वजन वाढवतो, वाढताना लक्ष देत नाही आणि मग वजन कमी होत नाही म्हणून चिंता करतो. अगोदर किलोकिलोने वाढवायचं अन मग कलेकलेने कमी करायचं. आज दहा माणसं एका रांगेत उभी केली तर किमान 9 व्यक्‍तींना रक्‍तदाब आणि मधुमेह असतो याचा गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे. मानसिक आरोग्यासाठी प्रत्येक गोष्टीत आनंद घेता आला पाहिजे, सकारात्मक दृष्टीकोन असला पाहिजे आपण घराबाहेर पडलो की कितीतरी गोष्टी आपल्याला आनंद देतात. रस्त्यावर घडणारे अनेक गंमतीशीर प्रसंग असतील, दुकानावर किंवा रस्त्यावर असणाऱ्या पाट्या असतील, काही सुविचार असतील उदा. नेहमी खरे बोलावे, म्हणजे काय बोललो हे लक्षात ठेवावे लागत नाही. अशा अनेक बाबींचा आनंद घेता येतो. रोजच्या प्रवासाचाही आपण ताण घेतो. पण हाच प्रवास सुखकर व्हायचा असेल तर त्यातही अनेक गोष्टी शिकण्यासारख्या व आनंद घेण्यासारख्या असतात. उदा. रस्त्यावर असणाऱ्या वाहनांवर लिहिलेली वाक्‍ये वाचली तर काही वाक्‍यं शिकवण देतात तर काही आनंद देतात. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे. प्रत्येकाला मान दिला पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे. प्राचार्य यशवंत पाटणे म्हणतात – शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे आणि शब्द माणूसकीचा ठेवाही आहे. शब्दांना देव मानण्याची कल्पना तुकोबारायांच्या व्यक्‍तीत्वातील देवत्वाचा प्रत्यय देते. हलकासा स्पर्श, एक साधंसं स्मित, एखादा ममतापूर्ण शब्द ऐकणारा कान, प्रामाणिक प्रतिक्रिया किंवा एखादी लहानशी मदत याचं महत्व आपण विसरतो खरं तर यातच जग बदलण्याची ताकद असते म्हणूनच आपल्या आयुष्यात काही कारणासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तींचा मनापासून स्वीकार करा त्यांना आपलंसं करा. सकारात्मक नातेसंबंध जपणं फार आवश्‍यक आहे. आपण तणावमुक्‍त जगण्यासाठी आध्यात्मिक आरोग्याची फार आवश्‍यकता असते यासाठी ध्यानधारणा आवश्‍यक आहे, विश्रांती आवश्‍यक आहे, हव्यासापोटी धाप लागून पडेपर्यंत आपणं थांबतच नाही, कुठे थांबायचं हे ठरवलं पाहिजे, कसं जगायचं हे ठरवलं पाहिजे, जगण्याला आध्यात्मिक अधिष्ठान हवे. पण याचा अर्थ असा नव्हे कुणातरी बाबा, बुवा, माताजी यांच्या नादी लागून संपूर्ण आयुष्य जगणं सोडून द्यायचं. आपल्या कर्तव्यापासून बाजूला जायचं, आपली भारतीय संस्कृती, आपले धर्म, आपले संस्कार, आपली तुकाराम गाथा, ज्ञानेश्‍वरी, दासबोध, बायबल, कुराण यासारखी ग्रंथसंपदा व त्याचे वाचन आणि आचरण आपल्यात असले पाहिजे. श्रध्दा असावी अंधश्रध्दा नको. श्रध्दा जगण्याचं बळ देते इच्छित साध्य करण्यासाठी शक्‍ती देते. आयुष्याच्या प्रवासात दैनंदिन जीवनात कामात या सर्व गोष्टी जपल्या की जगणं कसं मजेशीर होवून जातं. यासाठी आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. स्वतःच्या प्रेमात पडणं म्हणजे आपल्यातील अमर्याद प्रेम करण्याची ताकद ओळखणं, एकदा का ही ताकद ओळखली की आपण स्वतःवरच नव्हे तर सगळयांवरचं प्रेम करू लागतो. माणसाच्या अन्न, वस्त्र व निवारा या तीन गरजा असतात पण सर्वात महत्वाची गरज असते ती म्हणजे मनाची. सर्व आयुष्य आनंदी असेलचं असे नाही त्यात दुःख हे असणारचं, नाहीतर मग जीवनाला अर्थ असणार नाही. जीवनात सर्व रस असले पाहिजे. प्रत्येकजण दुःखी असतो, पण दुःख उगाळण्यात अर्थ नाही. कायम ताण तणावात राहिल्याने त्यामुळे वैफल्य निर्माण होते, संघर्ष निर्माण होतो, दडपण येते, शारिरीक मानसिक अनेक बदल होतात काही वेळा याची परिणिती आत्महत्येत होते. खरंच जगणं एवढ वाईट आहे काय ? प्रत्येकाने निराशा आली तर सावरण्यासाठी एकतरी छंद जोपासला पाहिजे किंवा एखादी कला जपली पाहिजे. आयुष्यात आसू आणि हसू असलेच पाहिजे. प्रत्येकाला हसताही व रडताही आले पाहिजे म्हणजे ताणतणावमुक्‍त जगणे सहज शक्‍य आहे. दिवसभराच्या आनंद व कामानंतर रात्री झोपताना गादीवर किंवा कुठेही पडल्यावर शांत झोप जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही कितीही श्रीमंत असा, कीव करावी इतक्‍या वाईट अवस्थेत तुम्ही जगतं आहात. सुखाची झोप हे तुमच्या प्रामाणिकपणाचा उत्तम निदर्शक ! अब्जावधी डॉलर्सची कमाई बुडाली तरी चालेल, पण प्रामाणिकपणातून येणारी निवांत झोप त्यापेक्षा कित्येक पटीने मौल्यवान आहे. त्यामुळे दिवसभरात असं काम करा की ज्यामुळे शांत झोप येईल. म्हणून शेवटी कवी मंगेश पाडगांवकरांच्या शब्दात म्हणावासं वाटतं, पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं, की भरला आहे म्हणायचं, हे तुम्हीच ठरवायचं असतं, सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत…तुम्हीच ठरवा !

सुखानं जगण्यासाठी कसली तरी वाट पाहू नका, शिक्षणाची कटकट संपण्याची, चार किलो वजन कमी होण्याची, चौदा किलो वाढण्याची, लग्न होण्याची, शुक्रवारच्या संध्याकाळची, रविवारच्या सकाळची, नव्या को-या गाडीची, नव्या को-या साडीची, कर्जाचे हप्ते संपण्याची, उन्हाळयाची, पावसाळयाची, हिवाळयाची, महिन्याच्या एक तारखेची, वर्षाच्या सुरूवातीची, कसली, कसली वाट पाहू नका ! आनंदी जगणं म्हणजे असतं तरी काय? जगण्याचं समाधान आणि समाधानाने जगणं यासाठी लागतं तरी काय ? आनंदी जगणं म्हणजे असतं तरी काय? गायीच हंबरणं, नि आईची वाट पाहणं, म्हणजे नेमकं असतं तरी काय ? आनंदी जगणं म्हणजे असतं तरी काय ? त्याचं तिच्यासाठी आणि तिचं त्याच्यासाठी वाट पाहणं, म्हणजे नेमक असतं तरी काय ? एकदा एका रिक्षाटेम्पोवर लिहिलं होतं – आळसात खंगून मरण्यापेक्षा कष्ट करून मेलेलं चांगलं. तर एका ट्रकमागे लिहिलेले वाक्‍य – रामकाल मे मिला दूध, कृष्णकालमे मिला घी, कलियुगमे मिली दारू, सोच समझ कर पी. अनेक प्रसंगामध्ये आपण नेहमी अपयश आलं की त्याचं खापर दुसऱ्यावर फोडतो असाच अर्थ ध्वनित होणारं वाक्‍य – ए खुदा, मैं आपके दुवासे सुरक्षित हूं, लेकिन आपसे बिनती है की, आगेवालेकी रक्षा करो. प्रत्येक वाहनचालक त्याच्या व्यवसायानुसार वाक्‍य लिहित असतो, फुलवाल्याच्या टेम्पोवर लिहिलं होते की, केशरी रंग हिरवा देठ… आठवण आली तर पुन्हा भेट. एकदा तर रस्त्याच्या कडेला एक ट्रक चारही चाकं वर करून पडला होता अन्‌ त्यावर लिहिलं होतं आता कसं वाटतंय म्हणून… आठवले ना असे अनेक प्रसंग, अनेक क्षण जे आपल्याला आनंद देवून जातात. कधी आपण विचार करायला लागतो कधी स्वतःशीच हसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेतो. ताणमुक्‍त जगण्यासाठी सामाजिक आरोग्यही फार महत्वाचे आहे. आपले नाते संबंधही सकारात्मक असले पाहिजे. प्रत्येक भेटणारा माणूस आपल्याला काहीतरी शिकवत असतो. Share 0 Tweet 0 Share 0