User talk:Pakalwad yogesh
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तीमत्त्व, विचार आणि कार्य हे एकविसाव्या शतकातील वैश्विक समाजक्रांतीच्या अभ्यासकांचे, व पाईकांचे, चिंतनाचे आणि अनुसरणाचे प्रमुख दर्शन आहे. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्याचा नेमका आवाका कोणाही सच्च्या आंबेडकरवाद्याला अजूनही आलेला नाही. ही समाजपरिवर्तनाच्या चळवळीची खरी शोकांतिका आहे. या शतकातील जगासमोर किंग मार्टीन ल्यूथर, जॉर्ज डब्ल्यू कर्व्हर, मार्क्स, लेनिन, माओ, थॉमस पेन, म.ज्योतिराव फुले, म.गांधी हे महामानव समाज शिल्पज्ञ(Social Arcitect) म्हणून उभे राहणार आहेत. या सर्वांच्या मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विशिष्ट जात, वर्ग, वर्ण आणि विचार स्थानामुळे अग्रभागी असणार आहेत.
बाबासाहेबांचा जन्म एकोणिसाव्या शतकातला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एकूण विकास आणि प्रकाश विसाव्या शतकातला आहे. महामानवाला फारसे व्यक्तीगत जीवन नसते. किंवा असे म्हणता येईल की, त्यांचे व्यक्तीगत खाजगी जीवनसुध्दा त्यांच्या प्रकट सामाजिक जीवनाचेच एक अविभाज्य अंग असते. बाबासाहेबांचे अध्ययन, संशोधन आणि पदवीधारणाचे काम चालू असतानाच त्यांच्यातला दृष्टा महापुरुष आकार घेत असणार. आपली भावी दिशा आखत असणार. बाबासाहेबांची सामाजिक भूमिका स्वीकारण्याची सुरुवात साधारणपणे 1916 साली झाली असे आपण मानले तर सुमारे चाळीस वर्षे एक जिवंत भौतिक वैज्ञानिक विचारयंत्र जागतिक समाजरचनेच्या फेरमांडणीचा जिवंत प्रयोग बाबासाहेबांच्या रुपाने करत होते, हे आपण समजून घेतले पाहिजे. जगातला कुठलाही महापुरुष शून्यात, चमत्काराने अवतरत नसतो. कोणी काहीही म्हटले तरी तो ईश्वराचा पुत्र, प्रेषित, पूर्वी होऊन गेलेल्या महापुरुषाचा नवा अवतार अगर ईश्वरी अवतार मुळीच नसतो. तत्कालीन समाजवास्तवाचा वेध घेत विसंगती, विषमता, शोषण आणि अन्यायाच्या विरोधी मूलगामी संघर्ष उभे करणारे ते एक गतीमान सातत्यशील लोकनेतृत्व असते. जनप्रबोधनाच्या लाटेमागून लाटा उभा करणारे, समाजजीवन व्यवहारात वेगवेगळया चळवळी उभ्या करुन आचार आणि विचाराच्या नव्या संहिता पेरुन समाजाची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि क्रांतीकारीता विकसित करणारे ते एका समाजशास्त्रज्ञाचे घडणारे आणि घडविणारे प्रेरणारुप असते. भूतकाळातील अपयशी पण क्रांतीकारी प्रयोगांचे तपशील, तत्त्वज्ञान आणि व्यवहार अभ्यासत भविष्यकाळातील सहकाऱ्यांच्यासाठी कार्यशैलीचा वस्तुपाठ उभा करत नवजीवन दर्शन उभे करणारे ते इतिहासाचे एक अपरिहार्य पान असते.
बाबासाहेबांनी अभ्यास, निरीक्षण आणि चिंतन बालपणीच सुरु केले. ज्ञान आणि शहाणपण एकाच वेळी घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या बालपणी समाजसेवेचे दलितवर्ग सुधारणेचे, दानाचे, उपकाराचे असंख्य प्रयोग सुरु होतेच. बाबासाहेबांचे वेगळेपण मूलगामिता, क्रांतीकारीता आणि पर्यायी समाजरचनेच्या शक्यतांचा वेध घेण्यात आहे. त्यांनी गडबडीने कोणाचा गंडा दोरा बांधला नाही. घाईगर्दीने व्यवस्थेचा एक भाग होणे टाळले. व्यवस्था परिवर्तनासाठीचा अभ्यास आणि प्रयोग आरंभला. तर्कसंगतता, विवेकशिलता, विज्ञाननिष्ठा व्यापकता, सखोलता आणि व्यवहार्यता ही बाबासाहेबांच्या कार्यशैलीची वैशिष्टये आहेत. त्यांनी प्राचीन भारतीय भौतिक संघर्षाचा आणि अवैदिक परंपरेचा वेध घेतला. त्या प्रवासात त्यांना गौतम बुध्द, महावीर, चार्वाक, निस्मार, दिग्नाग, अश्वघोष, धम्मकिर्ती, चक्रधर, बसवेश्वर भेटले. भक्तीसंप्रदायातले कबीर, तुकाराम, चोखोबा अठरा पगड जातीचे संत भेटले. म.फुले, शाहू राजे त्यांच्या समोर होतेच. मार्क्स, एंगल्स, केन्झ, थॉमस पेन, रुसो, वाल्टेअर, व्हिटमन, सॉक्रेटिस प्लेटो, ऍरिस्टॉटल या साऱ्यांचे विचारदर्शन बाबासाहेबांनी जवळून घेतले होते. इंग्लंड, अमेरिकेतील विद्यापीठांची ग्रंथालये बाबासाहेबांनी आपली साधनागृहे बनविली. तत्कालीन अनेक प्राध्यापक, विद्यार्थी यांच्याबरोबर चर्चा केल्या. बुध्द, कबीर आणि फुले या गुरुत्रयींनी बाबासाहेबांना जीवनमूल्ये पुरविली. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा पाया घातला. जीवनातील अस्पृश्यता आणि दारिद्य्राच्या वास्तवाने त्यांना अनुभवाचे कारुण्य मूल्य बहाल केले.
प्रज्ञा, करुणा आणि शील. शिका व संघटीत व्हा आणि संघर्ष करा. राजकारणाच्या गाडीचे चालक व्हा! आपल्या घराच्या भिंतीवर जावून लिहा आम्ही राज्यकर्ती जमात होणार आहोत! ही आणि अशा आशयाची आवाहने करुन बाबासाहेबांनी आपली विचार दिशा मांडली. बाबासाहेब लोकशाहीवादी, जातीअंताचा लढा उभारणारे शुद्रातिशूद्र आणि स्त्रियांच्या हक्काचे रक्षणकर्ते ठरले. शाहूराजांनी सुरु केलेल्या राखीव जागांच्या धोरणाला बाबासाहेबांनी उत्क्रांतरुप दिले. भारताची राज्यघटना लिहून भारतीय समाजाच्या भावी वाटचालीची दिशा त्यांनी आखून दिली. धर्मांतराच्या कृतीने त्यांनी हिंदू अस्पृश्यांना गौतम बुध्दांच्या अनित्यतावादाच्या क्रांतीकारी वाटेवर उभे केले. रिपब्लिकन पक्षाची स्थापना करुन एक लोकशाहीवादी राजकीय महामार्ग त्यांनी तयार केला. आपल्या दर्जेदार, विपूल, वैचारिक साहित्य लेखनातून जात, वर्ण, वर्ग, लिंगवादी विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजव्यवस्थेत बदल घडविण्याची आयुधे बाबासाहेबांनी भारतीय जनसमूहांना बहाल केली.
बाबासाहेबांना आपला जीवन प्रवास करत असताना अनेक कटू गोड अनुभव आले होते. पुरोगाम्यांच्या मर्यादा. प्रतिगाम्यांचे कडवेपण. विद्वानांचा एकांगीपणा. गरीब पण सवर्ण जनतेची गतानुगतीकता. कष्टकऱ्यांच्या राजकारणाचे फूटीरपण. सर्वदूर पसरलेला वर्गजाणीवेचा अभाव. व्यापक-सर्वंकषतेचा आत्मविश्वास न गवसलेले पक्ष आणि पुढारी. जात वर्ण वर्ग वंशांच्या किमान पाच-सहाशे लहान मोठया गटागटात विखुरलेला समाज. स्वजातीच्या खोटया मोठेपणाविषयीचा अहंकार आणि परजाती विषयी द्वेष पोसण्याची मानसिकता. मागास उत्पादन पध्दती. सरंजामी जमीनदार आणि नव्याने विकसीत होऊ घातलेल्या भांडवलदारांचा समाजातला वरचष्मा. संवेदनाहीन क्रूर बनलेली शोषणयंत्रणा. स्वत:च्या शोषणाबद्दल, शोषकाबद्दल फारसे ज्ञान, व संताप नसलेले थंड पडलेले जनसमूह. अज्ञान, दारिद्य्र, विषमता, अंधश्रध्दा, अनारोग्य आणि व्यसन अशा दोषांनी ग्रस्त समाज. या आणि अशा भारतीय जनसमूहांच्या वास्तव प्रश्नांचे भान असणारे फार थोडे नेते तत्कालीन भारतीय समाजात उपलब्ध होते. काहींचा अभ्यास चांगला होता पण ते कृतिसंदर्भात संकुचित होते. व्यापक चिंतन आणि संवेदनशीलतेचा अभाव हे भारतीय नेतृत्वाचे खास चरित्र आहे. दीर्घकाळ जाती बंद रचनेचे खोलवर रुजलेले दुष्परिणाम नवा माणूस नवे आधुनिक नेतृत्व तयार करण्यात अडसर बनत होते. म.गांधींच्या सारखे आश्वासक सर्वस्पर्शी नेतृत्व उच्चवर्ण वर्गांच्या, अभिजन वर्गाच्या हृदय परिवर्तनावर, दलित कष्टकरी आणि स्त्रियांच्या अभ्युदयाचा रंजक आशावाद पेरत होते. प्रबोधनाच्या पातळीवरची व्यापक, प्रतिनिधीक आंदोलने करुन समाज समन्वयाच्या पध्दतीने आधुनिक लोकशाही समाजनिर्मितीचे स्वप्न म.गांधी पहात होते. या पार्श्वभूमीवर लोकशाहीवादी पण प्रखर जनआंदोलनांच्या आधारे सामाजिक, आर्थिक न्यायावर आधारीत नवा विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीचे स्वप्न डॉ.आंबेडकरांनी पाहिले. रचना प्रबोधन आणि संघर्षाच्या पायावर तळातील जातवर्गातून उत्क्रांत होऊ घातलेला एक नवा राजकीय प्रवाह डॉ.आंबेडकरांनी जन्माला घातला. त्यांनी पुढच्या शंभर वर्षातील समाजाच्या बदलाचे चित्र पाहिले. तोच विषय आपल्या चिंतनाचा, संवेदनशीलतेचा विषय बनविला. आपले सारे लेखन त्यांनी त्या दिशेने आशयघन बनविले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या प्रकारचे समजशक्तीने समृध्द बनलेले एकटे आणि एकमेव प्रभावी जनमान्य नेते होते.
आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय उपखंडाबरोबर सारे विश्व हालले, हादरले. बाबासाहेबांचे हे असे आपल्या कार्यकर्तृत्वांच्या शिखरावर असताना कालवश होणे सर्वांना धक्का देऊन गेले होते. अजून किमान दहा वीस वर्षे बाबासाहेब आपले विश्व समाज निर्मितीचे गतीमान काम करत राहतील असे अनेकांना वाटत होते. बाबासाहेबांच्या नंतरची त्यांच्या अनुयायांची पाचसहा वर्षे स्वत:ला सावरण्यात गेली. त्यानंतर हे सर्व अनुयायी गटागटात विभागलेले जनतेने पाहिले. नेतृत्वाच्या व्यक्तीवादी अतिरेकाने चळवळ फुटत गेली. भारतातली भांडवली लोकशाही आपल्या गतीने विकास पावत होती. देशी विदेशी भांडवलदार लढणाऱ्या जनसमूहांना प्रभावहीन बनविण्याचे नवे नवे मार्ग शोधत आहेत. सरंजामदार, जमिनदार आणि धर्मांध जातीयवादी मनापासून भांडवलदाराशी एक रुप होत आहेत. दलित, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, छोटे कष्टकरी शेतकरी, कारागीर, बलुतेदार, आलुतेदार, आदिवासी, भटक्या विमुक्त जमाती, स्त्रीया हे आंबेडकरी लोकशाहीच्या विकासाचे मूळ घटक दिवसेंदिवस फूटकळ बनत आहेत. परस्परविरोधी दावे करत आहेत. आंतरविरोध, विसंगती, अविश्वास आणि अहंकाराने परिणामशून्य बनत आहेत. आंबेडकरी प्रवाहाचे अग्रदल नवबौध्द बहुजन समाजाला आपल्या पंखाखाली घेऊ शकणारे व्यापक नेतृत्व देण्यात आजतरी यशस्वी झालेले नाहीत. तसे प्रयत्नही दिसत नाहीत. उत्तर भारतामध्ये सत्तरच्या दशकापासून कांशीराम यांनी समाजशास्त्रीय दृष्टया शास्त्रशुध्दपणे बहुजन समाजाची चळवळ बांधली. बामसेफ डी.एस.फोर आणि पुढे बहुजन समाज पक्षाच्या रुपाने एक राजकीय प्रवाह उभा केला. चौदा खासदार आणि सत्तर आमदार निवडून आणण्यात त्यांनी यश मिळविले. फुले, शाहू, आंबेडकर यांची नावे आणि तत्त्वज्ञान मांडण्यात त्यांनी यश मिळविले पण एका राजकीय संकटातून बाहेर येण्यासाठी आणि सत्तेच्या मोहातून त्यांनी भाजपबरोबर युती करुन आपल्या विकासाच्या शक्यता आपल्याच हातांनी धुळीला मिळविल्या. डॉ.आंबेडकरांच्या नंतरचा संसदीय राजकारणात सर्वात जास्त यशस्वी झालेला हा आंबेडकरवादी नेता पथभ्रष्ट झाला. बहुजनांच्या चळवळीतला कोलंबस वाट चुकला.
सत्तेच्या माध्यमातून समाजपरिवर्तन हे यशवंतराव चव्हाणांचे आवडते राजसूत्र कांशीरामनी अनुसरले. तुफान प्रचारच्या क्षमता लाभलेल्या मायावतींनी ते पुढे नेले. बहुजन जातींचे संघटन जातीअंतासाठी, बहुजन समाजनिर्मितीसाठी करायचे हे सूत्र व्यवहारात मागे पडले. बहुजन समाजपक्षाने आपले नेमके आर्थिक धोरण आजवर ठरविले नाही. पहिला निवडणूक जाहीरनामा पक्ष स्थापने नंतर वीस वर्षांनी जाहीर केला. मतांचे आडाखे, जागांचे गणित अडवणूक क्षमतेचा अधिक लाभासाठी वापर मूल्यशून्य आघाडया यामुळे पक्षाची विश्वासार्हता क्रमश: घसरत चालली आहे. गुजराथमध्ये नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यापर्यंत मायावतींची मजल जावी, याचा खऱ्या आंबेडकरवाद्यांना खेद वाटणार नाही काय? शाहू विद्यापीठ नवे जिल्हे, आंबेडकर उद्यान असे करत करत मायावती ताज कॅरीडॉर पर्यंत पोहोचल्या. आता आर्थिक गुन्हेगार म्हणून त्यांना तुरुंगाच्या कॅरीडॉर मध्ये पाठवायला भाजप उत्सुक आहे. महाराष्टातला रिपब्लिकन पक्ष धर्मांध जातीयवाद्यांपासून आजपर्यंत तरी सावध आहे. या ना त्या भांडवली पक्षाचा दुय्यम सहकारी बनल्यावाचून या पक्षाचे पाऊल पुढे पडत नाही. निवडणूका लढवायला पैसा लागतो. दलित जनता आणि नेत्यांच्याकडे तेवढा पैसा नाही. पण नवे पर्याय शोधणार का नाही? एकसंघ पक्ष उभारणार का नाही? नवबौध्दाशिवाय उर्वरीत दलित जाती, जमाती, आदिवासी, फिरत्या जमाती, आलुतेदार, बुलतेदार, कारागीर, कष्टकरी जनसमूहांमध्ये विश्वासार्हता तयार करुन पक्षाचा पाया विस्तारीत करणार की नाही? कधी कसे करणार? असे अनेक प्रश्न आज उभे आहेत.
दुसऱ्या बाजूला या जगातली एक महत्वाची विचारधारा म्हणून आंबेडकरवाद विकसीत होतो आहे. देशात आणि परदेशात सर्वदूर आंबेडकरांच्या वैचारिक मांडणीचा सखोल अभ्यास होतो आहे. भारतीय उपखंडातील सर्व देशातली दलित कष्टकरी तळातली जनता आंबेडकरवादी, प्रभावी, प्रवाही आणि आश्वासक नेतृत्वाच्या शोधात आहे. जनतेचे प्रश्न, शोषण वाढलेले आहे. धर्मांध जातीयवादी आणि भांडवलदार एकजीवाने जनतेला मिळत आहेत. दहशत वाढवत आहेत. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, व्यापारीकरण, यांत्रिकीकरण अशा धोरणांनी जनता हैराण झालेली आहे. सांस्कृतिक साम्राज्यवादाने परिसीमा गाठली आहे. रेडीओ, टी.व्ही., वर्तमानपत्रे जाहिराती आणि भांडवली प्रचारात दंग आहेत. गरीब कष्टकरी दलित निर्णायकी बनते आहे. एक पर्याय म्हणून आंबेडकरांच्या विचाराकडे आकर्षित होते आहे. डॉ.आंबेडकरांची जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाच्या आगे मागे सारा भारतवर्ष आंबेडकरमय झालेला असतो. नागपूर, मुंबईपासून पाच दहा घरांची बकाल खेडी कोटयवधी भूकेकंगालांच्या अस्मितादर्शनाने नीलसागर बनत आहेत. जगातली वीस टक्के जनता आंबेडकरांना कमी जास्त प्रमाणात ओळखते, मानते. जगातल्या दोनशे देशात आंबेडकरी दर्शनांचा अभ्यास या ना त्या कारणासाठी सुरु आहे.
या अवस्थेत खऱ्या आंबेडकरी नेतृत्त्वाने आत्मविश्वासाने आक्रमकपणे राजकीय सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात आश्वासक हस्तक्षेप केला पाहिजे. व्यापकता, सखोलता, शास्त्रशुध्दता, क्रांतीकारकता आणि तडजोड शून्यता स्वीकारुन जननायकत्व खेचून घेतले पाहिजे. भोगवादी भांडवली संस्कृतीला पर्यायी दलित कष्टकरांची विचार आणि कृतिनिष्ठ राजकीय संस्कृती उभी केली पाहिजे. नवा चारित्र्यसंपन्न राजनायक जनतेत उभा केला पाहिजे. नवी साधने, नव्या प्रचार पध्दती अवलंबल्या पाहिजेत. पायी, सायकल, मोटर सायकल. फार तर एखाद दुसरी जीप एवढया तटपुंज्या साधनावर परिसर ढवळून काढला पाहिजे. हातावर चटणी भाकर खाणे. ओढया नाल्यावर कपडे धुणे, गरीबाच्या झोपडीसमोर एअर कंडिशन वातावरणात विश्रांती घेणे अंगिकारले पाहिजे. असे केले तर वीस वर्षात खरा आंबेडकरी नायक देशाच्या प्रमुख पदी पोहोचेल. कष्टकऱ्यांची लोकशाही क्रांती सफल होईल. गरज आहे विचारनिष्ठेची. श्रमिक, दलित निष्ठेची. समाजक्रांतीच्या तळमळीची. दृष्टिकोनाची आत्मविश्वापूर्वक राबण्याची.
Start a discussion with Pakalwad yogesh
Talk pages are where people discuss how to make content on Wikipedia the best that it can be. Start a new discussion to connect and collaborate with Pakalwad yogesh. What you say here will be public for others to see.