Jump to content

User:Sachinbansude

From Wikipedia, the free encyclopedia

पळसदेव ( Palasdeo ) पळसनाथ मंदिर ( Palasnath Temple )

[edit]

पळसदेव उत्तरेला दोन किलोमीटरवर उजनी जलाशय आहे. या जलाशयातच १९७५ साली मूळ पळसदेव गाव बुडाले. गावचा हा बुडालेला भाग उंचावरचा असल्याने तो पूर्ण न बुडता त्याला एखाद्या बेटासारखा आकार प्राप्त झाला आहे. प्राचीन काळी पळसदेव ही एक भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. गावाभोवती तट होता. या तटाला चार वेशी होत्या. भट, नाथ, चांभार आणि मुख्य अशी त्यांची नावे. गावाभोवतीने वाहणाऱ्या भीमेस पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत घाट होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर पळसनाथ, नागनाथ आणि काशी विश्वनाथाची उत्तम बांधणीची मंदिरे होती. पण १९७५ साली इथे हा जलाशय साकारला आणि अन्य गावांबरोबरच पळसदेवलाही उजनीने आपल्या पोटात घेतले. धरणात बुडालेले पळसनाथ आणि काठावरचे काशी विश्वनाथाची कोरीव मंदिरे आल्या- आल्या लक्ष वेधून घेतात. यातील काशी विश्वनाथ पाण्याच्या काठावर. धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसलेले. त्याचा कोरीव प्राकार दुरूनच लक्षात येतो. जवळ जाऊ लागताच त्यावरील सजीवता जणू आपल्या मनाचा ताबाच घेते. मंदिर पश्चिमाभिमुख. पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना द्वारमंडप, सभागृह आणि गर्भगृह अशी त्याची रचना. शिखर पूर्णपणे कोसळलेले. द्वारमंडप व सभामंडपातील खांब कोरीव, रेखीव छत, तर बाह्य़ भिंती घडय़ांच्या आकारात दुमडत बांधलेल्या. त्यावर पुन्हा रेखीव कोनाडे, उठावदार शिल्पे. सारा प्राकारच एखाद्या अद्भुत जागी उभे असल्याचा भास निर्माण करणारा. भिंतीवरील सारी शिल्पे आजही जिवंत अगदी काल-परवा कोरल्याप्रमाणे यात रामायणावर आधारित अनेक प्रसंग. अशोकवनातील सीता, हाती शिळा घेऊन सेतू बांधणारे वानर, समुद्रातील जलसृष्टी, राम- रावणाचे युद्ध असे हे प्रसंग जणू त्या मंदिराचीच कथा बांधू पाहतात. हे सारे पाहत आतमध्ये गाभाऱ्यात यावे. मात्र इथे कुठलीही मूर्ती दिसत नाही. स्थानिक गावकरी सांगतात, की अनेक वर्षांपासून देवतेविनाच हे मंदिर आहे. यासाठी ते इथे एक दंतकथाही पुरवतात, पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले, पण इथे कुठल्या देवतेची स्थापना करायची, यावरून त्यांच्यात भांडण झाले. शेवटी हे मंदिर देवतेविनाच राहिले. पुराणातील भांडणावरून या मंदिरास पुढे 'भांडपुराण' असेही नाव पडले. खरेतर काशी विश्वनाथ या नावावरून प्राचीन काळी हे महादेवाचेच मंदिर असावे आणि मध्ययुगात कधीतरी यवनी आक्रमणापासून बचाव करण्यासाठी इथली देवता अन्यत्र हलविली असण्याची शक्यता वाटते. मंदिराच्या रचनेवरून ते हजारएक वर्षे प्राचीन नक्कीच असावे, यासाठी परिसरातीलच बलीच्या मंदिरातील शिलालेखाचा अभ्यास होणे आवश्यक वाटते. असो. पळसनाथाचे मंदिरही असेच कोरीव-कलात्मक! हेमाडपंती वास्तुरचनेत तत्कालीन समयी भूमीज पद्धतीच्या शिखरांना विशेष महत्त्व होते. पळसदेवचे हे मंदिर त्यापैकी एक असून, अशा प्रकारची शिखर पद्धती तुरळक प्रमाणात होती. प्राचीन शिखरकलेत त्यावरील उभ्या पट्टय़ांना ‘रथ’, तर आडव्या प्रत्येक मजल्यास (थरास) भूमी असे म्हणतात. एकाखाली एक असे दाबलेले तरी स्पष्टपणे जाणवणाऱ्या या मजल्यांच्या शिखर पद्धतीस भूमीज शिखर पद्धत म्हणतात. येथील शिखरावर असे सात मजले असल्याने ते सप्तभूमीज पद्धतीचे शिखर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या शिखर रचनेत प्राचीन वास्तुकलेतील शुकनास प्रकारही दिसून येत आहे. या वैशिष्टय़पूर्ण शिखर पद्धतीतून आपल्याकडील प्रसिद्ध अशा ‘नांगर’ व द्राविड या दोन शिखर पद्धती स्वतंत्रपणे पुढे आल्या. अशा पद्धतीचे मंदिर हे महाराष्ट्र राज्यात दुर्मिळ असून त्यांना होयसाळ हेमाडपंती प्रकारातील म्हणून संबोधले जाते. या मंदिरातील शिवलिंग हे मंदिर पाण्यात जाण्यापूर्वी ३५ वर्षांपूर्वी पळसदेवच्या ग्रामस्थांनी त्या वेळी हलविले असून, नव्या गावठाणात नवीन मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली आहे. तत्कालीन समयी पळसदेव ग्रामस्थ बंधूंनी पुढाकार घेऊन या मंदिरातील शिवलिंग व काही विरगळी व प्राचीन मूर्ती नवीन गावात आणल्या. जुन्या मंदिराला पळसदेवच्या ग्रामस्थांनी श्रद्धेपोटी हातही लावला नाही. शंभर चौरस मीटरच्या भागात हे प्राचीन अवशेष मिळाले असून यामध्ये पश्चिमाभिमुख असलेले पळसनाथाचे मंदिर कलेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, तीन बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता व व्याल अशा पंचशाखा अशी अनेक वैशिष्टय़े या मंदिरात असून, मंदिराची ही एकूण रचना व त्याची कलापद्धती पाहता हे उत्तर चालुक्य काळातील कल्याणी चालुक्याच्या राजवटीतील असावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या मंदिराशेजारीच बलीच्या मंदिरात सापडलेल्या शिलालेखात शके १०१९ असा उल्लेख आढळल्याने त्यास लिखित आधारही प्राप्त होत आहे. मात्र आज ते पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. त्याचे उंच गेलेले सप्तभूमिज पद्धतीचे शिखर तेवढे पाण्यातून वर डोकावताना दिसते. कधी १९७५ साली पाण्यात बुडालेले हे मंदिर २००१ मधील दुष्काळात पूर्णपणे उघडे पडले होते.