User:Jay Gajanan Mauli
कल्पकतेचे शिखर : आतिश सुरेश सोसे
कल्पक आणि सृजनशील कवी, गुणवंत लेखक, अभ्यासू संपादक तसेच अतिशय संवेदनशील माणूस म्हणून सुपरिचित असलेले एक प्रभावी व्यक्तिमत्त्व; आणि मराठी साहित्यातील प्रख्यात साहित्यिक म्हणजेच आतिश सुरेश सोसे. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील टाकरखेड येथे २६ ऑक्टोबर १९ ८० रोजी झाला. मध्यमवर्गीय, शिक्षकी पेशा अखंड सांभाळणारे त्यांचे वडील म्हणजे सुरेशराव सोसे. संस्काराने परिपूर्ण अशी त्यांची आई म्हणजे शोभाताई सोसे. त्यांचे आई-वडील म्हणजे अत्यंत सुशिक्षित व सुसंस्कृत दांपत्य. या परीपूर्तेच्या कुटुंब वात्सल्य लाभलेल्या सहवासात त्यांचे बालपण गेले.
त्यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अकोला आणि पुणे येथे पूर्ण केले. त्यांनी मराठी साहित्यात बी. ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर बी. कॉम., पत्रकारितेत बी. जे. आणि प्रिंट मिडिया, इतिहास आणि मराठी विषयाअंतर्गत बी.एड. आणि एम.ए. पूर्ण केले आहे. तसेच एम.एड. शिक्षणशास्त्र ही पदव्युत्तर पदवीही संपादन केली. अशा अनेक वैविध्यपूर्ण पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीला आकार दिला. आतिश यांनी संगणक शास्त्रातील एम्. एस्.सी. आय. टी., फोटोशॉप, डिटिपी, सी.पी.सी.टी., सी. लिब. इत्यादी प्रमाणपत्र परिक्षाही यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
तल्लख बुद्धिमत्ता आणि समृध्द प्रतिभा लाभलेल्या आतिश सोसे यांनी लहानपणी वयाच्या तेराव्या वर्षापासूनच साहित्य लेखनाला सुरूवात केली. आई-वडील आणि बहिणींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच त्यांचे लेखन अधिकाधिक समृध्द होत गेले असं ते अभिमानाने सांगतात. यावेळी प्रथम त्यांनी कविता लेखनाला सुरूवात केली. मुलांच्या भावविश्वाची आणि कल्पनाविश्वाची जाणीव त्यांना असल्याने बालकुमारांचे ते आवडते कवी, लेखक ठरले. त्यांची कविता म्हणजे सहज, सोप्या, तालासुरात आणि ठेक्यात गवसणारी सुबोध अशी शब्दकळा आहे. त्यांच्या मते कवितेमध्ये सहज आलेला नाद, अनुप्रास आणि ठेका हा फार महत्त्वाचा आहे. इयत्ता आठवीत असताना दैनिक ‘नवयुगवाणी’ या वृत्तपत्राचे संपादक, मालक विजयभाऊ राठोड यांनी त्यांना ‘बालवाणी’ या आठवड्याच्या पुरवणीचे संपादन करण्याची सर्वप्रथम संधी दिली. त्यानंतर दैनिक ‘विश्वशिवशक्ती’ , दैनिक ‘लोकमत’ या वृत्तपत्रांमधून पुरवणी संपादनाची जबाबदारी पार पाडत दैनिक ‘अकोला दर्शन’ या दैनिक वृत्तपत्रामध्ये अकोला, वाशीम, बुलढाणा या तीन जिल्हयाच्या आवृत्तीचे 'सहसंपादक' म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. यासोबतच ते बी.ए.भाग -१ मध्ये शिकत असताना ओरिसा राज्यामधून भारतातील साठ प्रादेशिक भाषेत आणि बोलीभाषेत प्रकाशित होणाऱ्या ‘प्रिय ताई’ या बाल त्रैमासिकाचे सहसंपादक म्हणूनही अनेक वर्षे काम पाहिले. त्यानंतर मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या ‘राजमंच’ या पाक्षिकाचे ‘कार्यकारी संपादक’ म्हणून काम पाहत असताना अनेकांना लिहिण्याची प्रेरणा देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ते सर्वांचे मूर्तिमंत प्रेरणास्त्रोतच ठरले.. याशिवाय ‘केसर’ पुणे आणि ‘सतेज’ अकोला यासह अनेक नियतकालिकांचे अभ्यासपूर्ण संपादनही त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि प्रसिध्द बालसाहित्यिका आदरणीय डॉ. विजया वाड यांनी त्यांच्यातील अभ्यासू संपादकाची वृत्ती टिपून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई आणि मुंबई येथे अभ्यागत संपादक, संपादकीय सहाय्यक आणि सहसंपादक अशा पदांसाठी त्यांची नियुक्ती केली. वाड बाई आणि त्यांचा स्नेहबंध अतिशय जिव्हाळ्याचा असल्याने ते त्यांना कायम ‘आईसाहेब’ म्हणूनच संबोधतात. याच आईसाहेबांनी दिलेल्या संधीचे सोने करीत त्यांनी ‘महाराष्ट्र कन्या चरित्रकोश’ सहित खंड१७ ते खंड २० मधील नोंदी लेखन, मुद्रित शोधन, संपादित नोंदी करीत, मंडळाचा परिचय नव्याने लिहून देत भरीव असे कार्य केले आहे. त्यासाठी त्यांनी ब्रिटानिका, कोलियर सह अनेक एनसाइक्लोपीडियासह इंग्रजी ग्रंथाचे वाचन आणि अभ्यास केला आहे. या कार्यकाळात त्यांना अनेक मातब्बर आणि दिग्गज व्यक्तींचा जवळून सहवास लाभला. तसेच या भरीव कार्यातूनच त्यांना संदर्भ ग्रंथ कसे वाचावे? संदर्भ कसा शोधावा? हे नव्याने कळले असे ते आदराने , अभिमानाने सांगतात.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ज्या वाड्यात राहायचे,त्या वाड्यात बराच काळ राहता आले,हे क्षण भाग्यवत आहेत,असेही ते नेहमी म्हणतात. याच दरम्यान त्यांनी गोवा येथील ‘विश्वचरित्र कोश’ या खंडांकरिताही अनेक नोंदींचे लेखन केले आहे. त्यांचे लिखाण सातत्याने विविध नियतकालिकांमधून प्रसिध्द झाले आहे.
मला आठवतं महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई येथे माझी जून २००८ मध्ये अभ्यागत संपादक म्हणून निवड झाली होती. तिथेच मी आतिश सरांना भेटले. मी त्यांना भेटताच त्यांनी हसतमुखाने माझे स्वागत केले. सरांकडे कन्याकोशाची पूर्णत: जबाबदारी होती. जुजबी प्रश्नोत्तरे विचारून मला त्यांनी तेथील कामाचे स्वरूप समजावून सांगितले. त्यांनी माझ्या मानसिक मनाचा अभ्यास करून ‘शारीरिक उंचीपेक्षा कार्याच्या उंचीने आपण सर्वत्र परिचित असणे’ हे महत्त्वाचे आहे, असे सांगून माझे मनोबल वाढविले. तेव्हा मला जाणवले जणू काही आपण एका गुरुजनांकडून शिकवण घेत आहोत. नकळत त्यांच्या विषयी मनोमनी आदर दुणावला. नित्य आलेल्या प्रत्येक नोंदीचे प्रथम प्राथमिक वाचन करणे, त्याची शब्दसंख्या पाहणे, प्राथमिक नोंद वाचनातून आलेले अभिप्राय नोंदीच्या शेवटी लिहून ठेवणे आणि मुख्य म्हणजे आलेली नोंद विश्व कोशाच्या पद्धतीनुसार तयार करणे इत्यादी आमच्या कामाचे स्वरूप होते. मी हे सर्व काम कमी अवधित शिकले. माझा कामाचा ओघ आणि कामाची तळमळ यांचा संगम घडून आल्याने सरांना माझ्याबद्दल दृढ विश्वास निर्माण झाला. त्यांनी माझ्या कामाची गती वाढवली. काम आवडल्यास ते लागलीच शाबासकीची थाप देत; परंतु कामात चुका झाल्या तर ‘परत परत तेच नव्याने शिका मग चूक लक्षात येईल’ असे ते सांगून चोख काम मिळेपर्यंत कुठेही स्वत:च्या मनाचा तोल जाऊ न देता शांतपणे समोरच्याला समजावून सांगत. ही त्यांची शिक्षण देण्याची अनोखी पद्धत मला खूपच आवडली. कामादरम्यानचा सर्व वृत्त्तांत ते वाड बाईंना वेळोवेळी कळवत असत. आम्ही चौघे जण कन्याकोशावर काम पहात होतो. चौघांची एकजूट होती. कामात सर्व जण पारंगत होतो. आमच्यातील हेच खेळीमेळीचे वातावरण पाहून बाई नेहमीच खुष व्हायच्या. प्रत्येक व्यक्तीला सरांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. परंतु नेहमी ४ वाजता सर्वांनी कामाचा तपशील सादर करण्याची सरांची पद्धती होती. त्यामुळे प्रत्येकाला सर्वच कामाची माहिती व्हायची. या कामाच्या पारदर्शक पद्धतीमुळे बाई सरांचे नेहमीच कौतुक करायच्या. त्यावेळी सर बाईना लागलीच सांगायचे ही सर्व यांची मेहनत आहे. कौतुकाची थाप ते कधीही एकट्याच्या पाठीवर घेत नसतं. यातून सहकार्य आणि सर्वांना समभाव देणे या त्यांच्या गुणांची नव्याने ओळख झाली होती. इंद्रधनुष्य जसं सात रंगांनी परिपूर्ण असते तसेच सरांच्या कामाच्या पद्धतीमध्ये सप्तशैली दिसून आली. मौखिक संवादापासून ते भावनिक सुप्त संवादाची शैली आम्हा सर्वांमध्ये सरांमुळे निर्माण झाली. त्यांची प्रत्येक आठवण म्हणजे आम्हांला पुढील आयुष्याच्या प्रवासासाठी एक शिदोरी ठरली. एवढ्या कमी वयात सरांचा सर्वच विषयांचा सखोल अभ्यास, चौफेर वाचन व प्रचंड ज्ञान पाहून त्यांची ‘सहसंपादक’ पदी सन्मान झाल्याचे पदोपदी जाणवले.
जीवनातील सखोल अनुभव, कल्पनाशक्तीची झेप, अभ्यासू वृत्ती, सहजता आणि उस्फूर्तता या त्यांच्या लेखनाच्या ठळक वैशिष्ट्यांची जपणूक करत त्यांनी अकोला येथे १३ सप्टेंबर १९९५ रोजी ‘शुभम साहित्य मंडळाची’ स्थापना केली. त्यांच्यातील कुशल कार्यकर्ता या गुणाची ओळख देत गेल्या तीन दशकांपासून ते ‘शुभम’ चळवळीच्या माध्यमातून राज्यभर साहित्य संमेलने भरवून नव्या-जुन्या साहित्यिकांसह विविध क्षेत्रातील मंडळींना एकत्रित आणून नवा विचार पोहचविण्याचे काम करीत आहेत. पुढे या मंडळाचा विस्तार करून ‘शुभम मराठी, बालकुमार युवा व नवोदित साहित्य मंडळ’ असे नामकरण करून या मंडळाच्या वतीने अकोला, पनवेल, धुळे इत्यादी शहरांसह नऊ राज्यस्तरीय साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केले. दहाव्या संमेलनापासून दोन दिवशीय राष्ट्रीय शुभम मराठी, बालकुमार युवा व नवोदित साहित्य संमेलनांचे आयोजन केले जात असून गोवा येथे सुप्रसिध्द साहित्यिक मा. शिवचरण उज्जैनकर यांच्या संमेलनाध्यक्षेखाली भरविण्याचा त्यांचा मानस आहे. या संमेलनांमध्ये दरवर्षी अकोला येथील प्रा.दीपाली आतिश सोसे यांनी स्थापन केलेल्या व दीपाली मॅडमच सर्वेसर्वा असलेल्या‘आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अॅकॅडमी’ आणि ‘विद्यार्थी सर्वांगीण विकास केंद्र’,अकोला यांच्या वतीने सर्वच वाड्.मय प्रकारातील ग्रंथांमधून निवडक पाच ग्रंथांना ‘राज्यस्तरीय आनंदी साहित्य पुरस्कार’ आणि विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीना ‘एस.एस.सोसे जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते. हे सर्व उपक्रम नि:शुल्क आयोजित केले जातात, हे विशेष महत्त्वाचे आहे असे ते आवर्जून सांगतात. या वर्षापासून त्यांनी “आनंदी आंतरराष्र्टीय सांस्कृतिक संमेलन"दरवर्षी एका देशात आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला असून त्या दिशेने त्यांनी नियोजन व बांधणीही सुरु केली आहे. शुभम चळवळीचे ते संस्थापक-अध्यक्ष असून ‘शिवम बहुउद्देशीय संस्थेचेही ते अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या वतीने संतश्रेष्ठ गजानन माऊलींच्या नावाने ‘एस.जी.एम.प्रि.स्कूल’ या नावाने ग्रामीण भागात कानशिवणी या गावी त्यांचे जिवलग मित्र प्रा. संदीप फासे यांच्या संस्थापकीय पुढाकाराने इंग्रजी माध्यमाची शाळा तीन वर्षांपासून यशस्वीपणे चालविली जात आहे. घरातील शिक्षणाचे बाळकडू जपत परिसरातील ‘तळमळीचे शिक्षक’ म्हणून उपाधी मिळवून त्यांनी अनेक शाळांमध्ये अध्यापनही केले असून सध्याही ते एका खाजगी शाळेत ‘शिक्षक’ म्हणून कार्यरत आहेत.
याशिवाय ते नवी दिल्ली येथील नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया - पुस्तक क्लब, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई येथील बालरंजन संस्था तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अशा विविध नावाजलेल्या आणि प्रतिष्ठित संस्थांचे आजीव सभासद आणि सभासद आहेत.
त्यांच्यातील उत्तम निवेदक आणि वक्ता या सुप्त गुणांमुळेच मुंबई, पुणे शहरातील मोठमोठ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करीत महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, अनेक मैफिलींचे सुमधूर निवेदन करून त्यांनी रसिकांना ज्ञान आणि मनोरंजनाची मेजवानीच दिली. आकाशवाणी केंद्र, अकोला येथेही त्यांनी ‘युवावाणी’ या कार्यक्रमाचे अनेक वर्षे ‘निवेदक’ म्हणून काम पाहिले आहे. यासठी त्यांनी नवी दिल्ली येथील प्रसार भारतीचे प्रमाणपत्रही प्राप्त केले आहे. अनेक ध्वनिमुद्रिका आणि चित्रफितींमध्येही ही त्यांनी निवेदन केले आहे. याशिवाय फोटोग्राफी,शुटिंग हेही त्यांचे आवडते छंद आहेत.
आजवर तब्बल बहात्तरहून अधिक प्रकाशित कथा, कविता, कादंबरी,चरित्रे, बालवाड्.मय अशा विविध प्रकारातील ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. त्यांची ही सर्व ग्रंथसंपदा अकोला, नागपूर, यवतमाळ, नाशिक, जळगाव, सोलापूर तसेच पुणे, औरंगाबाद, मुंबई आणि ओरिसा येथील प्रतिष्ठित प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केली आहेत. त्यातील अनेक ग्रंथांनी नऊ-दहा आवृत्यांच्या प्रकाशनापर्यंत झेप घेतली आहे. त्यांचे अनेक ग्रंथ आतापर्यंत शासनाच्या मुंबई येथील ‘ग्रंथनिवड समिती’ द्वारे महाराष्ट्रातील ग्रंथालयांसाठीच्या यादीसाठी निवडले गेले आहेत. अॅमेझॉन, बुकगंगा यांसारख्या प्रतिष्ठित ऑनलाईन कंपनीद्वारेही त्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. ‘उमलत्या कळ्या’, ‘तू’, ‘फुलांचा सडा’, ‘गोष्टीरूप शिवाजी’, ‘युगपुरुष’, ‘संत तुकाराम’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘संत एकनाथ’, ‘संत नामदेव’, ‘संत गाडगेबाबा’, ‘संत मुक्ताई’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘हिंदुहृदयसम्राट सावरकर’, ‘स्वामी विवेकानंद’, ‘क्रांतीच्या गर्भातून’, ‘वृक्षमैत्री’, ‘सारं काही प्रेमासाठी’, ‘भेट’, ‘मला भावलेल्या कविता’, ‘विज्ञानाचे शिल्पकार’, ‘महात्मा बसवेश्वर’, ‘समर्थ रामदास स्वामी’, ‘इतिहासातील शूर सेनानी’, ‘धीरूभाई अंबानी’ यांसह एकूण बाहात्तर ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. त्या ग्रंथांना मराठी साहित्यातील अग्रगण्य व्यक्ती म्हणजे साधना वृत्तपत्राचे संपादक यदुनाथ थत्ते, प्रख्यात कादंबरीकार शिवाजी सावंत, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि प्रसिध्द बालसाहित्यिक मा. डॉ. विजया वाड , प्रख्यात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, अभिनेत्री आणि साहित्यिक डॉ. निशिगंधा वाड यांच्यासह अनेक मान्यवरांचे अभिप्राय लाभले आहेत. त्यांच्या ‘मी आणि माझ्या प्रेमकविता’, ‘भेट’ यासह अनेक ध्वनिमुद्रिका व चित्रफिती प्रकाशित आहेत. त्यांनी अनेक ग्रंथांना प्रस्तावना व अभिप्रायही लिहिलेले आहेत.
अशा गणमान्य लेखकाने कोणताही बडेजाव न करता साधेपणाने भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्यावर ‘महाराष्ट्र कन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’ हा जीवनचरित्रपर ग्रंथ लिहून बालसाहित्यामध्ये मोलाची भर घातली. हा जीवनचरित्रपर ग्रंथ फक्त मराठी भाषेत प्रकाशित न राहता भारतातील तब्बल तेवीस प्रमुख आणि बोली भाषांमध्ये अनुवादित झाला आहे. यासाठी अनेक मान्यवरांनी अनुवादकाची जबाबदारी लीलया पार पाडलेली दिसून येते. या जीवनचरित्रपर ग्रंथाच्या अनुवादकांचे ते ऋणनिर्देशन करण्यास कायम तत्पर असतात. आपल्या इतकाच या सर्व साहित्यिकांचा या ग्रंथासाठी मोलाचा वाटा आहे आणि हे साहित्यिक माझ्यासोबत नसते तर एवढे अद्वितीय कार्य घडले नसते हे ते आवर्जून सांगतात. म्हणूनच संधी मिळताच ते त्यांच्या तपशीलासह जसे की, संस्कृत अनुवाद प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री समिरा गुजर, इंग्रजी अनुवाद हेमांगी कडू, हिंदी अनुवाद श्रुती गुप्ता, गुजराथी अनुवाद प्रा. रुचि दिक्षित, मालवणी अनुवाद सूर्यकांत राऊळ, अहिराणी अनुवाद डॉ. रमेश सूर्यवंशी, झाडीबोली अनुवाद डॉ.हरिश्चंद्र बोरकर, सांताली अनुवाद विश्वनाथ तुडू, भोजपुरी अनुवाद डॉ. ज्ञानप्रकाश आर्य, उर्दू अनुवाद ओझर अहमद, वऱ्हाडी अनुवाद राहूल भगत, हलबी अनुवाद दीपक माहितकर, कोंकणी अनुवाद सौ. दीपिका अरोंदेकर, कन्नड अनुवाद शोभा देवाडिगा, मारवाडी अनुवाद माया धुप्पड, भिल्लोरी अनुवाद डॉ. पुष्पा गावीत, लेवा गणबोली अनुवाद सुरेश यशवंत, कैकाडी अनुवाद चंद्रकला गायकवाड, तडवी अनुवाद अजीज तडवी, बंजारा अनुवाद विष्णू राठोड, तमीळ अनुवाद व्ही. चित्रा, पारधी अनुवाद प्रा. पी. बी. सोनवाणे, मावची अनुवाद डॉ. माहेश्वरी गावीत या प्रसिध्द अभ्यासक, अनुवादकांचे आभार व्यक्त करतात. जणू काही सोनेरी क्षण टिपण्याची त्यांची ही अनोखी अदाच !
या ग्रंथाचे नाट्यरुपांतर संजीवनी मुळे यांनी केले असून या ग्रंथाची सीडी प्रसिध्द संगीतकार माधुरी नाईक यांनी केली आहे. या सी.डी.चे अभिवाचन प्रसिध्द असून याचे निवेदन प्रसिध्द अभिनेत्री समिरा गुजर यांनी आणि रंगमंचीय कार्यक्रमाचे निवेदन प्रसिध्द अभिनेते अंशुमन विचारे यांनी केले आहे. या ग्रंथाबाबत आणखी एक सन्मानाची बाब म्हणजे या ग्रंथाचे रसग्रहण अंध विद्यार्थी व गुणवंतांना करता यावे म्हणून पुणे विद्यापीठाच्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी ब्लाइंड स्टुडंट लर्निंग सेंटर, प्रा. धनंजय भोळे यांच्या वतीने ऑडिओ सीडीची निर्मिती करण्यात आली आहे. एखाद्या ग्रंथावर एवढे प्रयोग ही खूप मोठी उपलब्धी आहे.
त्यांच्या काही कविता व ग्रंथ अनुवादित झाले आहेत. त्यांचे आजवर ७२ ग्रंथ प्रकाशित असून २५ ग्रंथांच्या द्वितीय, १५ ग्रंथांच्या तृतीय तर काही ग्रंथांची ९-१० व्या आवृत्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
त्यांच्या अनेक ग्रंथांचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी, अभिनेत्री रीमा लागू, अभिनेते मोहन जोशी, अभिनेते दीपक देऊळकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ, प्रख्यात कवी फ. मु. शिंदे, संपादक संजय आवटे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते झाले आहे.
त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा असून या जनमाणसातील अभ्यासपूर्ण निरीक्षणाच्या बळावर आजवर अनेक मान्यवरांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या आहेत. महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, भारताचे तत्कालीन कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, माजी राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील, अभिनेते महेश मांजरेकर, शेगाव संस्थांचे अध्यक्ष शिवशंकरदादा पाटील, ज्येष्ठ समाजसेवक आण्णाजी हजारे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाशजी आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, डॉ. रवींद्रजी कोल्हे यांच्यासह शेकडो मान्यवरांनी त्यांच्या लेखन व कार्याची प्रत्यक्ष भेटीनंतर कौतुक केले आहे.
उत्कृष्ट मुलाखतकार म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. आजवर त्यांनी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री सुलोचनादीदी, सीमा देव, आशा काळे, स्मिता तळवलकर, अलका कुबल, वर्षा उसगावकर, रेखा कामत, क्रांति रेडकर, अभिनेते प्रशांत दामले, साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली, संगीत क्षेत्रातील प्रख्यात गायिका साधना सरगम, पद्मजा फेणाणी, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आजवर त्यांच्या अनेक मुलाखती व कार्यक्रम मुंबई दूरदर्शन : सह्याद्री वाहिनी, ई-टीव्ही. मराठी, अल्फा मराठी, मी मराठी, साम मराठी या वाहिन्यांवर तसेच विविध आकाशवाणी केंद्रांवरून त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.
त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या लेखक शिबिरात चंद्रपूर येथील सोमनाथ येथे सहभाग घेतला होता. मुंबईद्वारा साहित्य प्रसार केंद्र प्रकाशित त्यांच्या ‘आई’ या कविता संग्रहाचा मान्यवरांसोबत समावेश आहे. त्यांच्या ‘द प्रेसिडेंट’ या अनुवादित ग्रंथाची ‘लव्हिंग सिस्टर’ या ओरिसा राज्यातील राष्ट्रीय स्तरावरील मासिकाकडून क्रमश: प्रकाशनार्थ निवड झाली. पुणे येथील ‘बाबांच्या कविता’ या वडिलांवरील मराठीतील पहिल्या कविता संग्रहाचे संपादन स्वत: आतिश आणि सुनिल चव्हाण यांनी केले आहे. या संपादित कवितासंग्रहाला दैनिक नवाकाळ, मुंबई वृत्तपत्राने अग्रलेख लिहून या ग्रंथाचा सन्मान केला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती, बालभारती यांच्या ‘किशोर’ मासिकाच्या मुखापृष्ठावरही कविता प्रकाशित होण्याचा बहुमानही त्याना कार्यकारी संपादिका ज्ञानदा नाईक यांच्याकडून लाभला आहे. ‘आपलं सचित्र बालमित्र’ या शैक्षणिक ग्रंथात मलपृष्ठावर इंग्रजी अनुवादासह ‘गुरुजी’ ही मराठी कविता प्रकाशित होण्याचा सन्मानही त्यांनी मिळवला आहे.
आजवर आतिश यांना अनेक मानाचे पुरस्कार लाभले आहेत. सोलापूर येथील बालकवी पुरस्कार, नागपूर येथील पद्मगंधा आणि समाजचेतना पुरस्कार, अकोला येथील शब्दवलय पुरस्कार, सांगली येथील अ.भा.बालकुमार साहित्य संमेलन पुरस्कार, हिंगोली येथील अंकुर शोधपत्रकारिता पुरस्कार, पुणे येथील मातृमंदिर विश्वस्त संस्था पुरस्कार आणि नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मानवता गौरव पुरस्कार तसेच पुणे येथील ग. दि. मा. पुरस्कार, ओरिसा येथील बाबाजी संग्रहालय पुरस्कार, नाशिक येथील वाड्.मयसेवा पुरस्कार तसेच नवी दिल्ली येथील झेडआयआय टिचर एनोव्हेशनल अवॉर्ड इत्यादी अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
सुप्रसिध्द लेखिका आणि सोज्वळ कार्यकर्तृत्वाच्या दिपाली सोसे या त्यांच्या सुविद्य व उच्चविभूषित पत्नी आहेत. आणि या हरहुन्नरी दांपत्याचे दोन चक्षू म्हणजे चिमुकली, गोंडस मुले चिरंजीव स्वराज आणि अद्विक .
अशा नेत्रदीपक आणि जाज्वल यशाने संपन्न आतिश यांनी लेखन व कार्य क्षेत्रात आपली धुरा अढळ पद लाभलेल्या ध्रुवाप्रमाणे परिपूर्ण करून ठेवली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मनाचा मुजरा...
~~~~~~~~~~~~
*प्रा.मनीषा कदम*
ग्रंथपाल,सिध्दिविनायक ग्रंथालय,मुंबई.