Jump to content

User:Bhushan.kulkarni1987

From Wikipedia, the free encyclopedia

एक अजिंक्य योद्धा : बाजीराव पेशवा

आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना त्यासंबंधी कायदे करताना शासनाची, राज्यकर्त्यांची नेहमीच होणारी दमछाक आपल्याला नवीन नाही. सद्यस्थितीला देशावर होणारे आतंकवादी हल्ले पाहिल्यास हा देश, ही जनता आणि देशाची एकात्मता सुरक्षित आहे का असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं खरं परंतु त्याचे मोल असल्यासारखे आपण वागत नाही; समाज म्हणून नाही आणि राष्ट्र म्हणूनही नाही. शत्रूचा सामना कसा करावा, आतंकवाद्यांशी लढताना नेमकं काय धोरण असावं ? याबाबत कुठल्या योजना सरकारने केल्या आणि राबविल्या ? आणि देशाच्या संरक्षणार्थ आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या लोकांची आठवण आपल्याला कितपत होते? इतिहासात असे अनेक पराक्रमी योद्धे झाले. बहुतांश लोकांना आजही त्या पराक्रमी योध्यांबद्दल आणि ह्या देशाचा इतिहासाबद्दल पूर्णपणे माहिती नाही आणि तो पूर्ण माहित करून घेण्याची त्यांची फारशी इच्छाही नाही कारण आता आम्ही स्वतंत्र आहोत. आम्हाला इतिहास विचारला कि छत्रपती शिवरायांपासून सुरु करून ते गांधी नेहरू पर्यंत पोपटासारखे बोलून आपण तो संपवतो. मला आज ह्या महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राची आठवण येथे करून द्यायची आहे कि ज्याने नुसत्या हिंदुस्थानच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात “एक अजिंक्य योद्धा” असा आपला ठसा उमटवला. जो जगातल्या अपराजित योध्यांपैकी एक मानला जातो. नुकतीच ‘ श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ‘ यांची ३१२ वी जयंती होऊन गेली त्याबद्दल हा लेखनप्रपंच. सुमारे ३०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक रम्य परंतु भीषण असे नाट्य घडत होते. रंगमंच होता पेशव्यांची प्रत्यक्ष राजधानी ‘पुणे’ आणि कित्येक प्रवेश तर शनिवार वाड्यातूनच होत होते. ह्या नाट्यातील पात्र होते पेशव्यांच्या मातुश्री ‘राधाबाई’, पत्नी ‘काशीबाई’, मुलगा ‘नानासाहेब’ आणि बंधू ‘चिमाजीअप्पा’. आणि ह्या नाट्याचा महानायक होता एक अजिंक्य योद्धा, महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेणारा ‘बाजीराव पेशवा’. “छत्रपतीं” पासून सुरु झालेली मराठी सत्ता ज्यांच्यामुळे पूर्णत्वास गेली आणि ज्यांच्यामुळे मराठी साम्राज्याची व मराठी सत्तेची वेगळी ओळख अवघ्या हिंदुस्तानास झाली ते म्हणजे “बाजीराव पेशवे“. छत्रपती शिवरायांच्या काळात अनेक ब्राम्हण घराणे जातीने ब्राम्हण असूनही अंगी असलेल्या शौर्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर राज्यकारभारात वावरू लागली आणि नावलौकिकास आली. बाजीराव पेशव्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला. २ एप्रिल १७२० रोजी बाळाजी विश्वनाथ भटांच्या निधनानंतर १७ एप्रिल १७२० रोजी बाजीराव पेशवेपदावर विराजमान झाले आणि अवघ्या २० वर्षांच्या थरारून आणि थक्क करून सोडणाऱ्या राजकीय कारकीर्दीत सारा हिंदुस्थान आपल्या घोड्यांच्या टापांखाली दणाणून सोडला. बाजीराव पेशवेपदावर आल्याआल्या मराठी सत्तेचा हिंदुस्थानभर विस्तार करण्यासाठी अश्वारूढ झाला आणि वीस वर्षे नेटाने तो उद्योग चालवून या देशात त्यावेळी कमीअधिक मानाने सत्ता गाजवीत असलेल्या सर्व हिंदू, मुसलमान आणि युरोपिअन ख्रिस्ती सत्तांना जाणवेल इतक्या प्रमाणात आपल्या दुरदृष्टीने यश संपादन केले याबाबत मात्र शंका नाही. परंतु दुर्दैवाने त्यांच्या ह्या अचाट पराक्रमाला त्याकाळचा ‘कर्मठ’ आणि ‘संकुचित’ वृत्तीचा समाज समजू शकला नाही. हे चित्र आजच्या काळातही फारस बदललेलं दिसत नाही. महापुरुषांच्या नुसत्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकायच्या, वाचायच्या आणि सोडून द्यायच्या ह्या वृत्तीमुळे समाजाला त्यांची खरी ओळख कधी होऊच शकत नाही. इतिहासकारांनी बाजीरावाचे जे वर्णन केले आहे त्याप्रमाणेच त्यांचे वागणेही होते. गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, मजबूत शरीरयष्टी आणि तितकीच मजबूत विचारशक्ती, एक कुशल व्यवस्थापक, एक अजिंक्य योद्धा असा हा मराठ्यांचा पंतप्रधान होता (नाहीतर आजकालचे पंतप्रधान) असो... जिकडे नजर पडेल तिकडे मुजरे झडतील असा दरारा होता. छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं अपूर्ण राहिलेल स्वप्न पूर्ण करण्याच वेड डोक्यात घेऊन राज्यकारभार करताना बाजीरावांनी अनेक इतर राजांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि मराठी तितुका अवघ्या हिंदुस्थानात फडकवला. ज्यावेळी बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजाने महंमदखान बंगष ह्या सरदाराविरोधात बाजीरावांकडे मदत मागितली; त्यावेळी छत्रसाल राजे लिहितात कि “ जो गती भयी गजेंद्र कि वही हमरी आज, बाजी जात बुंदेल कि बाजी रखियो लाज”. त्यावेळी म्हणतात कि बाजीराव आपल्या महालात जेवण करीत होते. पत्र वाचताच ते अर्धे जेवण सोडून असेल त्या सैन्यानिशी बुंदेलखंडाकडे रवाना झाले कारण त्यांचे म्हणणे होते कि “ उशीर झाल्यामुळे छत्रसाल पराभूत झाले तर लोक हेच म्हणतील कि बाजीराव जेवत होते म्हणून उशीर झाला ”. मैत्रीच राजकारण कसं करावं हे बाजीराव पेशव्यांनी दाखवून दिलं. पोकळ दंडावर फुकटचे शड्डू ठोकत बसणाऱ्या राज्यकर्त्यांनी आणि सरकारी यंत्रणेने काहीतरी शिकण्यासारखे आहे यातून. आणि त्या मैत्रीखातर आणि छात्रासाल राजांच्या शब्दाखातर बाजीरावांनी त्यांच्या “मस्तानी“ या मुलीशी विवाह केला. त्याकाळच्या कर्मठ समाजाने बाजीराव आणि मस्तानी यांचे संबंध मान्य केले नाही आणि समाजाच्या ‘विकृत’ वागणुकीने ‘बाजीराव-मस्तानी’ चा बळी घेतला. परंतु त्याकाळी समाजाला या गोष्टीची जाणीव कधीच नव्हती कि ह्याच पराक्रमी बाजीरावामुळे आणि त्याच्या रण-कुशलतेमुळे मराठे मोंगल आणि निजाम यांसारख्या सत्ताधिशांना राजकारणात आणि रणांगणात धूळ चारू शकले आणि मराठी साम्राज्य महाराष्ट्राबाहेर जाऊन आपली स्वतंत्र, वेगळी ओळख निर्माण करू शकले. परंतू समाजात ही विकृतीच आहे कि समाजाच्याच भल्यासाठी झटणाऱ्या लोकांची चांगली ओळख आणि चांगल्या गोष्टींची आठवण समाज कधीच ठेवत नाही. आणि आजही आपण असेच वागणार असू तर ती समाजाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. अवघ्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ४३ लढाया लढून त्यातली एकही लढाई न हरलेल्या ह्या अजिंक्य योद्ध्याने माळवा, बुंदेलखंड, दक्षिणेकडची स्वारी, कोकणातल्या लढाया, दिल्लीवरील स्वारी, निजामाशी केलेली लढाई, नादिरशहा, पोर्तुगीज यांच्यासोबतची लढाई आणि अशा अनेक लढाया विशेषकरून प्रसिद्ध आहेत. ह्या सगळ्या मोहिमांत त्यांच्या सोबत असणारे त्यांचे धाकटे बंधू चिमाजीअप्पा, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, पिलाजीराव जाधव, गोविंदपंत बुंदेले आणि यांसारख्या अनेक सरदारांनी बाजीरावांस दौलत वाढविण्यास सर्वतोपरी मदत केली. एक कुशल व्यवस्थापक, प्रशासक म्हणून जातीभेदाचे राजकारण न करता सर्वांना समान वागणुक देऊन उत्तम प्रशासन कसे चालवावे; ही ‘शिव छत्रपतींची’ शिकवण बाजीरावांनी चांगलीच अंमलात आणलेली होती. संकुचित आणि स्वार्थवृत्तीने न वागता आणि जातीचे राजकारण न करता सर्वधर्म समभावाने स्वराज्य, दौलत कशी वाढवावी याबाबत त्यांचा विशाल आणि व्यापक दृष्टीकोन नुसता महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाला लाभदायक ठरला. आणि म्हणूनच बाजीराव ‘अजिंक्य योद्धा’ ठरू शकले. त्याकाळी एवढी प्रगल्भ विचारशक्ती असलेल्या बाजीरावांची महाराष्ट्रच नव्हे तर सगळ्या हिंदुस्थानाला गरज होती. जर त्याकाळी सत्ता बाजीराव आणि त्यांच्या प्रमुख सरदारांकडे न जाता कोण्या असहिष्णू, धर्मांध जुलमी लोकांच्या हाती गेली असती तर साऱ्या हिंदुस्थानच्या दृष्टीने ती मोठी आपत्ती ठरली असती. आज हिंदुस्थानची अवस्था पाहता आजच्या काळात राजकारण करणाऱ्या आणि स्वतःला ‘नेते’ म्हणवून मिरवणाऱ्या भ्रष्ट राजकारण्यांना इतिहासातल्या ह्या अशा काही गोष्टींची माहिती करून देणे आवश्यक आहे. कारण त्यांना फक्त पैशाचं राजकारण कळतं. परंतु जनहित आणि राष्ट्रहिताचं ‘राजकारण’ कसं करावं ह्या गोष्टीची ‘अक्कल’ अजून त्यांना आलेली दिसत नाही. आपले अर्ध्याहूनही अधिक आयुष्य रणांगणात आणि घोड्यावर बसून मोहिमा करण्यात घालवलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा २८ एप्रिल १७४० रोजी मध्य प्रदेशमधील रावेरखेडी येथे मृत्यू झाला. रणांगणात अजिंक्य राहिलेल्या बाजीरावांची अखेर आजारपणात झाली. रणमैदानात तेजस्वी सूर्याप्रमाणे तळपत राहणाऱ्या ‘राउं’ च्या मृत्यूमुळे हिंदुस्थानची खूप मोठी हानी झाली. होय, कारण ते अजिंक्यच होते. रणांगणात कुठलाच शत्रू असीम पराक्रमी बाजीरावांच्या समोर उभा राहू शकत नव्हता. बाजीरावांच्या मृत्युनंतर सरदार राणोजी शिंदे यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांची रावेरखेडी येथे समाधी बांधली. परंतु आज शासनाच्या दुर्लक्ष्यामुळे त्या समाधीस्थळाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तूंच्या, गड-किल्ले, महापुरुषांच्या समाधीस्थळांच्या आपल्याच जनतेच्या आणि शासनकर्त्यांच्या हलगर्जीपणामुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण आपल्याच भूमीत जन्मलेल्या महापुरुषांना दैनंदिन जीवनाच्या गदारोळात पूर्णपणे विसरून गेल्याचे चित्र दिसत आहे. कोण कुठला तो स्वार्थी अमेरिकेचा ‘प्रेसिडेंट’ त्याला पायघड्या टाकण्यासाठी आपले सरकार धावपळ करते. कोण ती इंग्लंड ची राणी तिला आपण ‘क्वीन एलिझाबेथ’ म्हणतो. परंतु आपल्याच देशासाठी सर्वस्वाची होळी केलेल्या महान आणि पराक्रमी अशा योध्यांबदल अभिमानाने बोलायचं म्हटलं कि कुठलातरी न्यूनगंड आपण उगाच बाळगतो. आपल्या स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या ‘अडाणी’ समाजात बाजीराव म्हटलं कि “तो कोण ‘मस्तानी’ वाला का ?” असाही प्रतिप्रश्न करणारे महाभाग आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘श्रीमंत बाजीराव पेशव्यांची’ समाधी आता तिच्या मूळ जागेपासून काही अंतरावर हलवणार किंवा तिचे अस्तित्व नष्ट होणार कि काय? अशा आशयाची बातमी पेपरमध्ये आणि त्या संबंधात बरेचसे ‘आर्टिकल्स’ इंटरनेट वर वाचले. ह्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला मृत्यूनंतरतरी शांती मिळेल का ? शासन बाजीरावांच्या पराक्रमाची आठवण ठेऊन त्यांच्या समाधीची जागा सुरक्षित करण्याचे धाडस दाखवेल का ? मरणानंतर तरी बाजीरावांसारख्या महापराक्रमी आणि सच्या योद्ध्याला न्याय मिळेल का ?

भुषण कुलकर्णी, पुणे. 9765601224 Email - bhushan.kulkarni1987@gmail.com